December 17, 2010

पाककृत्या, मी आणि ब्लॉगपोस्ट

आपलाच ब्लॉग असल्यामुळे मी अक्षरश: काहीही लिहू शकते, नाही का? :P

तर मध्यंतरी मी काही रेसिपीज मायबोलीवर लिहिल्या. स्वयंपाक करायला मला मनापासून आवडतं. कोणत्याही पद्धतीचा - शाकाहारी, मांसाहारी. भारतीय प्रकारचा, विदेशी प्रकारचा. पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या सारस्वती रेसिपी तर लाजवाब! कोंड्याचा चविष्ट मांडा करायची कला सारस्वत बायकांकडून शिकावी - आज्जी, पणजी आणि थोडेफार आई, आत्या, मावशी ह्या कॅटेगरीमधल्या बायकांविषयी मी बोलतेय. तितकं तर नाही जमणार, पण जितकं काही शिकता येईल, बनवता येईल, तसं बनवायचं, खायचं - खिलवायचं ह्या गोष्टी मला आवडतात. आपल्या मायेच्या मंडळींची गर्दी जमलेय, मजेत, गप्पा टप्पा करत, जेवणं चालली आहेत आणि गप्पांमध्ये रंगून गेल्याने हातही नळाखाली धरुन त्यावर पाणी घेण्याआधी वाळून गेलाय... हे असलं काही अनुभवायला पुण्य लागतं...

नातेवाईक, मित्र - मैत्रिणी घरी याव्यात आणि आपण मायेनं रांधलेलं त्यांनी तितक्याच प्रेमाने खाऊन तृप्त व्हावं आणि आपल्यालाही दाद द्यावी, ह्यासारखं सुख नाही!

... तर काय सांगत होते, ठरवलं की आपण लिहित असलेल्या रेसिपीज एकत्र कराव्यात. आहे त्याच ब्लॉगवर. नाहीतरी ब्लॉग म्हजे काय हो? आपल्या मनातलं बोलायची जागाच ना? :)


ओल्या काजूंची उसळ

लागणारा वेळ:
३० मिनिटे
लागणारे जिन्नस:
पाव किलो ओले काजू, २ हिरव्या मिरच्या, १० -१५ काळी मिरी, २ टेस्पू ओलं खोबरं
फोडणी साठी - हिंग, हळद आणि मोहरी
चवीसाठी मीठ आणि साखर
वरुन घालण्यासाठी बारीक चिरुन कोथिंबिर

क्रमवार पाककृती:
काजू सोलून घ्यावेत.

कढईत तेल तापवून, त्यात हिंग, हळद आणि मोहरी यांची फोडणी करुन, वर काजू घालावेत. अर्धा वाटी पाणी घालून मंद गॅसवर मऊसर शिजू द्यावेत. काजू शिजत असताना, मिरी, हिरव्या मिरच्या व खोबरे एकत्र जाडसर वाटून घ्यावे.

काजू शिजल्यावर त्यात हे वाटण घालून,चवीपुरते मीठ व साखर घालून एकत्र करावे व ५ -१० मिनिटांनी गॅस बंद करावा. उसळ जरा ओलसरच ठेवावी.

सर्वात शेवटी वरुन चिरलेली कोथिंबिर घालावी.

वाढणी/प्रमाण:
२-३ जण
अधिक टिपा:
ओले काजू साधारण फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान मिळतात. सुकवलेले ओले काजूही मिळतात, ते वापरायचे असतील तर आदल्या रात्री पाण्यात भिजत घालून, दुसर्‍या दिवशी सोलावेत.

हीच उसळ, हिरव्या मिरची ऐवजी अर्धा चमचा तिखट व गरम मसाला प्रत्येकी, वापरुनही करता येते. बाकी कृती वर दिल्याप्रमाणेच.





उसळीचा फोटो मी काढलेला नाही.



खतखते


लागणारा वेळ:
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: अर्धी वाटी तूरडाळ.
भाज्या: पाव किलो लाल भोपळा, सुरण - थोडे कमीही चालेल, १ रताळे, २ मध्यम बटाटे, १ कच्चे केळे, उसाच्या करव्याचे ९- १० तुकडे, कच्च्या पपईचे तुकडे, नीरफणसाचे तुकडे, करांदे, कणग्या.

वाटण : पाव ते अर्धी वाटी खवलेले खोबरे व ४-५ तिरफळे.

इतरः हळद, तिखट, चिंच, गूळ, मीठ.

कृती: डाळ चांगली शिजवून घ्यावी व घोटावी .
फळभाज्यांच्या साली काढून त्यांचे मध्यम आकाराचे तुकडे करावेत.
डाळीमध्ये सर्व भाज्या जरुरी पुरते पाणी घालून शिजवून घ्याव्या. भाज्या शिजत असतानाच त्यात तिरफळे ठेचून घालावीत.
१ चमचा तिखट व हळद प्रत्येकी आणि छोट्या सुपारीएवढा गूळ घालावा. थोडा चिंचेचा कोळ घालावा.
खोबरे वाटून घेतानाही त्यात तिरफळे घालावीत.
सर्व भाज्या शिजल्यावर वरुन खोबर्‍याचे वाटण घालावे व ही भाजी चांगली खदखदू द्यावी. चवीपुरते मीठ घालायचे.
भाजी फार पातळ वा सुकी करावयाची नाही.

अधिक टिपा:
डाळ न वापरताही ही भाजी करता येते.
तिरफळे ताजी असली तर कमी वापरावी कारण त्यांना अधिक वास असतो. मग वाटणात २-३ आणि ठेचण्यासाठी २-३ चालतील. सुकी असतील तर जास्त घ्यायची. ५-६ प्रत्येकी. त्याची बी काढून टाकायची वापरण्याआधी. ह्यात अळू वापरतात का, तर नाही. ही ऋषीची भाजी नव्हे. ह्यात कांदा, लसूण, आले, धणे वगैरे घालत नाही आम्ही.


मुडदुशांचे (नगली) कालवण

लागणारा वेळ:
३० मिनिटे
लागणारे जिन्नस:
६ ताज्या नगली, मोठ्या मिळाल्या तर मज्जाच!नाहीतर जरा मध्यम आकाराच्या चालतील. काय करणार?
वाटपासाठी : २ टीस्पून धणे, १ छोटा चमचा हळद, १ छोटा चमचा तिखट, छोट्या आकाराचा एक कांदा - चिरुन, ५-६ मिरी, १ नारळाचे खोबरे (कोकणी/मालवणी पद्धतीमध्ये नारळाचा सढळ हस्ते वापर असतो, तुम्हाला कमी वापरायचा असल्यास, त्याप्रमाणे घ्या. चवीत मात्र फरक पडेल. )
इतर: किंचितसे आले - छोटा तुकडा अगदी बारीक चिरुन, १ टेबलस्पून तेल.
मीठ, थोडासा चिंचेचा कोळ.

क्रमवार पाककृती:
ताज्या नगल्या ओळखायची खूण म्हणजे त्या अगदी चकचकीत दिसतात. अतिशय देखणी आणि स्वच्छ अशी ही मासळी आहे. साफ करण्यासाठीही अधिक कष्ट घ्यावे लागत नाहीत.

खवले काढून टाकून नगल्या साफ करुन घ्याव्यात. दुकानातूनच माशांचे खवले साफ करुन, कल्ले काढून आणि मासे कापून देतात, पण घरी साफ करायचे असतील, तर सुरीची बिनाधारीची बाजू, खवल्यांच्या विरुद्ध दिशेने फिरवली असता खवले निघतील. विळीच्या पात्यावर जमिनीला समांतर असे मासे फिरवले असताही खवले निघतात, पण ह्याला प्रॅक्टीस लागेल. डोके व पोटात काही घाण असेल तर काढून टाकावी. कल्लेही काढावेत. नगलीचे २ वा ३ तुकडे करावेत व थोडा वेळ मीठ लावून ठेवून द्यावे. चिंचेचा कोळ वगैरे लावायची गरज नाही, कारण नगलीला उग्र वास नसतो.

१ वाटी खोबरे, चिरलेला अर्धा कांदा, मिरी, धणे हळद व तिखट ह्यांचे वाटप करुन घ्यावे.
उरलेल्या खोबर्‍याचा पहिला जाड रस काढून घ्यावा. पुन्हा एकदा वाटून अजून रस काढून घ्यावा. हा दुसर्‍यांदा काढलेला रस जरा पातळ असतो.

हे झाले की नगल्या व्यवस्थित धुवून घ्याव्यात.

१ टेबलस्पून तेल तापवून त्यात थोडा बारीक कांदा व बारीक चिरलेले आले टाकून चांगले नरम गुलाबी रंगावर परतावे. त्यवर धुतलेल्या नगल्या टाकाव्यात. वाटप व नारळाचा रस घालावा. चवीनुसार मीठ घालावे. अर्धा टीस्पून चिंचेचा कोळ घालून व नारळाचा रस व वाटप ह्यांचे मिश्रण अगदीच जाडसर झाले असेल, तर थोडे पाणी घालून मंद विस्तवावर व्यवस्थित उकळी आली, की गॅस बंद करायला हरकत नाही.


कैरीची उडदमेथी

लागणारा वेळ:
२० मिनिटे
लागणारे जिन्नस:
४ कोवळ्या कैर्‍या - बाठे नसलेल्या उत्तम.
१ वाटी खोबरे
२- ३ लाल सुक्या मिरच्या
मसाल्यातल्या छोट्या चमच्याचे माप - १ चमचा तांदूळ, १ चमचा उडीद डाळ, १ चमचा मेथी, १ चमचा धणे, १ चमचा मोहरी, १ चमचा हळद. मीठ, फोडणीसाठी हिंग अणि मोहरी, १ चमचा तेल.
किंचितसा गूळ.

क्रमवार पाककृती:
१. कैरीची साले काढून्, मध्यम आकाराचे तुकडे करुन वाफवून घ्यावी. कोवळी कैरी असेल तर लगेच शिजते, तेह्वा वेगळी वाफवायचीही गरज पडत नाही. कैरीच्या सालांची मस्त चटणी होते, फेकायला नकोत. : )
२. वाटण - खोबरे, लाल सुक्या मिरच्या, धणे व हळदीचे वाटण करुन घ्यावे.
३. तांदूळ, उडीद डाळ्,मेथी आणि मोहरी किंचित तेलात परतून घ्यावी, व वरील वाटणात घालून पुन्हा वाटून घ्यावे.
४. पातेल्यात हिंग मोहरीची तेलावर फोडणी करुन त्यावर वाफवलेले कैर्‍यांचे तुकडे घालावेत. कोवळ्या न वाफवलेल्या कैर्‍यांचे तुकडे घतले तर त्यांबरोबर थोडेसे पाणी घालून जरा शिजू द्यावे. कैरी गोळा होईपर्यंत शिजवायची नाही.
५. कैरी जरा बोटचेपी शिजली की त्यावर वाटण घालून बेताने आमटीसारखी कन्सिस्टन्सी होईल असे, इतपत पाणी घालायचे व जरा उकळी फुटू लागली की गूळ घालायचा.
६. चवीनुसार मीठ घालायचे. खूप उकळी काढायची नाही, एका उकळीनंतर गॅस बंद करायचा.


कोलंबीची उडदमेथी

लागणारा वेळ:
३० मिनिटे
लागणारे जिन्नस:
अर्धा किलो कोलंबी, २ कांदे, २ वाटी खोबरे, ७ -८ लाल सुक्या मिरच्या, १ चमचा उडीद डाळ, १ चमचा मेथी, १ चमचा तांदूळ, १ चमचा धने, ७- ८ काळे मिरे, १ चमचा मोहरी, सुपारीएवढी चिंच, मीठ, साधारण २ -३ चमचे हळद, २ मोठे चमचे तेल.

क्रमवार पाककृती:
कोलंबी विकत घेताना शिळी वा खूप वास येणारी अशी घेऊ नये, शिळी कोलंबी निस्तेज दिसते आणि मऊ पडलेलीही असते. कोलंबीचे वरील कवच काढून, डोके व मधील काळा दोरा काढून ती साफ करुन घ्यावी, व तिला मीठ लावून ठेवावे. कवच काढून टाकल्यावर, अगोदर भरपूर वाटणारी कोलंबी, अगदी एवढीशी दिसायला लागते! जरी कवच काढलेली विकत आणली, तरी घरी आणल्यावर तिच्यातील दोरा मात्र काढायला विसरु नये.

कांदे कापून घ्यावेत. ह्यातील थोडासा चिरलेला कांदा बाजूला काढून ठेवावा व उरलेल्या चिरलेल्या कांद्याचे २ भाग करावेत.

वाटण १: १ भाग चिरलेला कांदा व १ वाटी खोबरे, लाल मिरच्या, २ चमचे हळद व चिंच हे एकत्र करुन वाटावे.

वाटण २: उरलेला भाग चिरलेला कांदा, उरलेल्या खोबर्‍या आणि धण्यांसकट तेलावर परतून घ्यावा. हे बाजूला उतरवून, त्याच तव्यावर थोड्या तेलात १ चमचा उडीद डाळ, १ चमचा मेथी, १ चमचा तांदूळ, १ चमचा धने, ७- ८ काळे मिरे, १ चमचा मोहरी हे सारे एकत्र परतून घ्यावे. हे सारे एकत्र वाटावे. वाटण बा़जूला काढून, मिक्सरमध्ये थोडे पाणी घालावे व हे वाटणाचे राहिलेले पाणी उडदामेथीत घालण्याकरता ठेवावे.

मीठ लावलेली कोलंबी स्वच्छ धुवून घ्यावी.

एका पातेल्यात राहिलेला कांदा तेलावर परतून घ्यावा व परतताना त्यावर ४ -४ उडीद डाळीचे व मेथीचे दाणे घालावेत. परतून झाले की त्यावर वाटण क्र १ घालावे.

उकळी आली की त्यात कोलंबी घालावी. कोलंबी शिजली की वाटण क्र २ घालावे व चवीनुसार मीठ घालावे. वाटण क्र २ चे पाणीही ह्या उडदामेथीत घालावे, चांगली उकळी काढावी व उकळी आल्यावर गॅस बंद करावा.

कर्ली ह्या माशाचीही अशाच प्रकारे उडदमेथी बनवता येते.



नंतर पुन्हा अजूनही लिहीन. ह्या इथे लिहिलेल्या, मला बनवता येतात बरं! :P

2 comments:

भानस said...

ओल्या काजूची उसळ... अहाहाSSS!!! मी लगेच खयालोंमध्ये जाऊन खायलाही लागले गं. सहीच! आमच्या घरचेच असतात पण ते खायला आम्ही नेमके हजरच नसतो... :( पाकृ मस्तच.

खतखतेही मला आवडतेच आणि कैरीची उडदमेथीही भन्नाटच लागते.
सामिषाबद्दल मी कोरी पाटी... पण वाचूनच वाटले सगळे वासावर जेवतो तसं वाचतांना जेवतील. :)

यशोधरा said...

thanks भानस