July 1, 2009

संस्कार, धर्म, श्रद्धा वगैरे वगैरे वगैरे....च्यां निमित्ताने!

मिसळपाववरचा हा लेख. लेखावर उत्तम चर्चाही सुरु आहे. ती चर्चा वाचून मलाही माझे काही विचार तपासून घ्यावेसे वाटले, म्हणून हा पोस्टप्रपंच.

मला मूळ लेखामध्ये काही वेळा प्रचंड परस्परविरोधी मुद्दे मांडल्यासारखे वाटतात. कदाचित माझ्या समजूतीची गल्लत असेल, मी नाकारीत नाही. लेख 'संस्कार' ह्या मूळ विषयापासून सुरु होत होत, आस्तिकता/ नास्तिकतेची वळणं घेत, धर्म ह्या विषयाला स्पर्ष करुन (इथे जगण्याचे तत्वज्ञान, पद्ध्त ह्या अर्थी हिंदू धर्म म्हणायचे आहे का धार्मिकता ह्या अर्थी? दोन्ही खूप वेगळ्या बाबी आहेत), रुढी आणि त्या अनुषंगाने येणारे आचार, विचार, पद्धती येथवर येऊन पोहोचतो. ह्या पैकी नक्की चर्चा कशावर? की सगळ्यांच बाबींवर? कारण प्रथमदर्शनी पाहता एकमेकांशी निगडीत वाटणार्‍या ह्या सर्व बाबी भिन्न आहेत, असं मला वाटत.

उदाहरणार्थ: संस्कार आणि त्यावरुन आस्तिक वा नास्तिक असण्याचा मुद्दा.

संस्कारित मन आणि आस्तिक वा नास्तिक वृत्ती ह्या सर्वस्वी भिन्न संकल्पना नाहीत का? एखाद्या व्यक्तीचे संस्कारित असणे आणि आस्तिक वा नास्तिक असणे ह्याचा परस्पराशी काय संबंध? माझ्या मते, संस्कार ही सातत्याने घडत राहणारी एक प्रक्रिया आहे. ती काही दहा- पंधरा मिनिटांत वा दिवसांत करता येणार नाही, किंवा नुसती स्तोत्रे वगैरे पाठ करुनही ती होणार नाही. केवळ उपचार म्हणून देवाची पूजा करणे म्हणजे संस्कार नव्हेत. ह्या अश्या गोष्टींना संस्कार कसे समजता येईल?

उदा: या देवी सर्वभूतेषू मातृरुपेण संस्थित: l हे नुसते पाठ करुन संस्कार निश्चित होणार नाही, पण, ह्या मागचा अर्थ समजावून जर हे स्तोत्र म्हटले तर, संस्कार जरुर होतील. सर्व जगात मातृरुपाने देवी वास करते आहे. म्हटले तर साधे वाक्य आहे, म्हटले तर आईचा मान का राखावा ह्याची शिकवण आहे. कधीकधी बुद्धीप्रामाण्यवादाचेही झापड लागू शकते. देवाचे स्तोत्र आहे म्हणजे ते केवळ उपचार म्हणून म्हणायचे असे का? त्यामागचा कार्यकारणभाव शोधायचा प्रयत्न केला तर कुठे बिघडते? हे स्तोत्र लिहिण्यामागे लिहिणार्‍याने काय विचार केला असेल, असे कधी वाटत नाही का? आडवे तिडवे वाचन आणि चर्चा करणार्‍याला हे प्रश्न कधी पडत नाहीत का? किंवा, गीतेमध्ये सांगितले आहे,

त्रिविधं नरकस्येदं द्वारं नाशनमात्मनः l
काम: क्रोधस्तथा लोभस्तस्मादेतत्रयं त्यजेत् ll
एतैर्विमुक्त: कौंतेय तमौद्वारेस्त्रिभिर्नरः l
आचरत्यात्मनः श्रेयस्ततो याति परां गतिम् ll

(गीता १६.२१ आणि २२ - चू भू माफ करा काही असेल तर)

थोडक्यात, काम, क्रोध आणि लोभ ही नरकाची ३ दारे आहेत. हे विकार आत्म्याचा विनाश करतात, तेह्वा यांचा त्याग करावा. हे अर्जुना, ह्या तीन तमोद्वारांतून (तमोगुणांमधून) मनुष्य सुटला म्हणजे तो स्वतःला कल्याणकारी आचरण करतो व परमगतीला प्राप्त होतो.

ह्यातला अध्यात्माचा भाग - परमगती वगैरे, स्वर्ग, नरक- सोडून देऊ हवे तर, पण हा उपदेश, संस्काराचा भाग नाही का? कशातून किती घ्यायचे, कसे घ्यायचे हे एका मर्यादेनंतर आपले आपणच ठरवायला नको का? असो.

माझ्या मते, साध्या सरळ शब्दांत संस्कार म्हणजे एखाद्याची वागायची पद्धत आणि (त्या व्यक्तीची) सत् विचारशक्ती ह्यांमधली सूसूत्रता. जेह्वा सत् विचारशक्तीवर असत् विचारशक्ती मात करते तेह्वा ते कुसंस्कार ठरतात. एकूणच संस्काराची प्रक्रिया सूक्ष्म आणि तरल असणार. जी व्यक्ती स्वतःचे स्वातंत्र्य जपताना, इतरांबद्द्ल आदर जपू शकते, ती संस्कारितच आहे, भले मग तिची वृत्ती आस्तिक असो वा नास्तिक.

तुकोबाराय म्हणतात,

अंतरी निर्मळ वाचेचा रसाळ l त्याचे गळा माळ असो नसो ll
आत्माअनुभवी चोखाळिल्या वाटा l त्याचे माथा जटा असो नसो ll
परस्त्रीचे ठायी जो का नपुंसक l त्याचे अंगा राख असो नसो ll
परद्रव्या अंध निंदेसी जो मुका l तोची संत देखा तुका म्हणे ll


हेच ना संस्कार?


क्रमशः....

5 comments:

सर्किट said...

सही! पटलं! इतकं पटलं की ज्या लेखावरून तुला हे ललित लिहावंसं वाटलं तो लेखही वाचायची गरज उरली नाही.

तुकोबारायांचा ’क्वोट’ एकदम भारी. त्यांचं मराठी आपल्याला २००९ मध्ये सुद्धा मराठी शब्दकोश न शोधावा लागता समजू शकतं हे केवढं भाग्यच - आपलं आणि फ़ार न बदललेल्या मराठीचंही. ज्ञानोबांच्या ओळी मात्र कुणी समजावून सांगितल्याशिवाय नाही समजत बऱ्याचदा (हा माझा शालेय जीवनातला एक अनुभव).

सखी said...

संस्कारांचं म्हणशील तर छान मांडत गेलीयेस...हे बर्‍याचदा वाटतं की आपल्या संकल्पना फार टोकाच्याच वृत्ती गाठतात. म्हणजे असला तर नाहीतर नाहीच...असं काहीतरी. या दोघांच्या पलीकडेही काही जागा उरतात ज्या फक्त अनुभवण्याजोग्या असाव्यात. शेवटी बघ नं नास्तिक माणसालाही देव आस्तिक आहे हे मान्य करुनच माझा त्यावर विश्वास नाही हे म्हणावं लागतं नं!
म्हणून संस्कार हा शब्द ह्या दोघांपेक्षा फार समर्पक व्याख्या करु शकतो. आपण वागतो, बोलतो, अगदी विचार करतो त्यामागे असतात संस्कार...नकळत घडलेले कधी आपणहून मान्य केलेले. पण लोकांना संस्कार म्हटलं तरीही फक्त चांगल्या घरांचे,आणि फक्त चांगल्या वागणुकीचे आदर्शच दिसतात. याव्यतिरिक्त संस्कारांची व्याप्तीच उरली नाही असं वाटायला लागतं.
असो....तुझ्या लेखाने एवढा विचार टायपाला लावला :) ह्यातच सगळं आलं.

यशोधरा said...

सर्किट, धन्यवाद. तुकोबांच्या लेखनाबद्दल एकदम सहमत.
सखी, छान मांडलस गं, आवडलं. :)

विशाखा said...

छान! लेख आवडला आणि पटलाही. असे बरेच संस्कार असतात ज्यांचा देवधर्माशी सुतराम संबंध नसतो- उदा. जेवतांना पानात न टाकणे किंवा हात धुवून जेवायला बसणे हे आपल्याकडे, तर पाश्चात्य देशात लहान मुलांना हाताने न खाता काटे-चमचे वापरून खायला शिकवतात, हे ही संस्कारच नव्हेत का? म्हणजे, संस्काराच्या कल्पना संस्कृतीप्रमाणे बदलत जातात.
काही वैश्चिक संकल्पना मात्र तुकोबांनी सांगितल्याहेत, त्या अदीम मानवी संस्कृतीच्या काळापासून चालत आलेल्या आहेत- उदा. परस्त्रीकडे वाईट दृष्टी न टाकणे. पण आजची "संस्कृती" बघता, असे अनेक लोक असतील, ज्यांना त्यात काही गैर वाटणार नाही.
तात्पर्य: संस्कार आणि संस्कृती, हे दोन्हीही स्थल-कालबाधित आहेत. आणि त्यामुळेच, सुसंकृतपणाचं पहिलं लक्षण हे, की आपल्याहून वेगळे संस्कार असणाऱ्यांना कमी लेखू नये.

प्रशांत said...

१०० % सहमत