September 5, 2008

गाणपत्य संप्रदाय

हिंदू धर्मात प्रामुख्याने पाच संप्रदाय आढळतात. सौर, गाणपत्य, शाक्त, शैव आणि वैष्णव. सौर संप्रदायाचा अधिपती सूर्य, गाणपत्य संप्रदायाचा अधिपती गणपती, शाक्त संप्रदायाची अधिपती शक्ती, शैव संप्रदायाचा अधिपती शिव आणि वैष्णव संप्रदायाचा अधिपती विष्णू मानला गेला आहे.

श्रीगणेशाची प्रामुख्याने आराधना करणारे ते गाणपत्य. या संप्रदायात सहा पंथ असल्याची नोंद आनंदगिरिंच्या शांकर दिग्विजय या काव्यात सापडते. हे सहा पंथ आणि यांच्या उपास्य दैवताची नावे अशी,

१. महा - दैवत महागणपती
२. हरिद्रा - दैवत हरिद्रागणपती
३. उच्छिष्ट - दैवत उच्छिष्टगणपती
४. नवनीत - दैवत हेरंबगणपती
५. सुवर्ण - दैवत सुवर्णगणपती
६. संतान - दैवत संतानगणपती

गाणपत्य गणपतीस परब्रह्म मानून इतर दैवतांना त्या परब्रह्माचा अंश मात्र मानतात, आणि हा संप्रदाय वामाचाराचा अवलंब करतो, अशीची नोंद या काव्य ग्रंथात आढळते. श्री शंकराचार्यांच्या अद्वैतमताच्या प्रभावाखाली हा पंथ आल्याने आणि वामाचारी पूजा पद्धतीबद्दल लोकमानसांत असलेल्या समज - गैरसमजांमुळे ह्या पंथाची वाढ होऊ शकली नाही, असे काही संशोधकांचे मत आहे. गाणपत्यांना वैदिक ब्राह्मणवर्गात मानाचे स्थान नव्हते व वैदिक धार्मिक विधींमध्ये इतर ब्राह्मणांसोबत त्यांना बसू देऊ नये अशीही प्रवृत्ती होती. आद्य श्री शंकराचार्यांनी प्रचलित केलेल्या पंचायनत पूजेनंतर हे आपापसातील मतभेद कमी झाले, असे मत संशोधक मांडतात. गाणपत्य संप्रदायाचा उदय पाचव्या शतकानंतर आणि नवव्या शतकाअगोदर झाला, असे मत संशोधकांनी नोंदवले आहे. ह्या संप्रदायाचा प्रमुख ग्रंथ म्हणजे गणेश पुराण.


श्रीमत्कृष्णानंद आगमवीश (१६ व्या शतकातील बंगालमधले कवी) यांनी आपल्या 'तंत्रसार' या ग्रंथामध्ये संकलित केलेल्या गणेश स्तोत्रात, गणपतीस ब्रह्मतत्व, आद्यदेव मानले आहे. या ग्रंथात, विभिन्न गाणपत्य संप्रदायांविषयी आणि महागणेश, हेरंबगणेश, हरिद्रागणेश आणि उच्छिष्टगणेश यांच्या उपासना पद्धती, मंत्र, ध्यान व पूजा पद्धती यांचे वर्णन सापडते.

तंत्रसार ग्रंथात महागणेश, हेरंबगणेश, हरिद्रागणेश आणि उच्छिष्टगणेश यांच्या रुपाचे वर्णन आले आहे.

महागणपती - गणपतीची दोन प्रकारची ध्यानरुपे आहेत. एक, दशभुज आणि अरुणासमान रक्तवर्ण असलेला, आणि दुसरा, गौरवर्णीय आणि चतुर्भुज. सर्वांगी हा रत्नभूषणांनी आभूषित असून ह्याच्या मस्तकातून सतत मद वाहत असतो.

ह्या गणपतीच्या ध्यान स्वरुपाचे वर्णन करताना कवि म्हणतात,


श्री महागणपतीचे मुख श्रेष्ठ हत्तीचे आहे. त्याच्या भालप्रदेशावर अर्धचंद्र विराजित असून, त्याची देहकांती अरुणवर्ण आहे. हा गणेश त्रिनयन असून, त्याची परमप्रिया हातात कमळ धारण करुन त्याच्या मांडीवर बसली असून तिने अतिशय प्रेमाने गणेशाला अलिंगन दिलेले आहे. आपल्या दहा भुजांमधे गणेशाने क्रमशः दंड, गदा, धनुष्य, त्रिशूल, चक्र, पद्म, पाश, उत्पल, धान्याच्या ओंब्या, स्वतःचा तुटलेला दात व रत्नकलश धारण केला आहे. रत्नकलशातल्या रत्नांची वृष्टी आपल्या साधकांवर करुन आपल्या साधकांना तृप्त करणार्‍या, अश्या गणपतीचे पूजन आम्ही करतो.

ह्या गणपतीचे ध्यान करण्यासाठी अठ्ठावीस, बारा व अकरा अक्षरी मंत्र आहेत.

हेरंबगणपती - तंत्रसार ग्रंथात, हेरंबगणपतीचीही दोन रुपे सांगितली आहेत. एक, चतुर्भुज, रक्तवर्णीय, तीन डोळे असणारा. आपल्या चार भुजांमध्ये त्याने क्रमशः पाश, अंकुश, कल्पलता (वेल) आणि आपला दात धारण केला आहे.

दशाक्षरी मंत्राने ह्या गणपतीचे ध्यान केले जाते.

दुसर्‍या रुपाप्रमाणे, तो पंचमुखी - पाचही मुखे हत्तीची असून दशभुज आहे. चार मुखे चार दिशांना आणि एक उर्ध्व दिशेस आहे. या मुखाचा रंग मोतिया वर्णाचा असून, बाकीच्या मुखांचा वर्ण सोनेरी, निळा, धवल आणि लाल रंगाचा (कुंकुमवर्ण) आहे. प्रत्येक मुखाला तीन डोळे असून, कपाळावर चंद्रमा विलसित आहे. त्याच्या देहाची कांती सूर्याप्रमाणे तेजस्वी असून, तो बलवान् आहे. सिंहावर आरुढ असून, दोन हात क्रमशः वर आणि अभयमुद्रा दाखवतात. बाकीच्या हातांमध्ये मोदक, दंत, लेखणी, मस्तक, माला, मुद्गल, अंकुश आणि त्रिशूल धारण केलेला आहे.

ह्या रुपाची साधना चार अक्षरी मंत्राने केली जाते.

हरिद्रागणपती -ह्या गणपतीच्या ध्यान मंत्रात वर्णन केल्याप्रमाणे, हा गणपती पीतवर्णीय असून चतुर्भुज आहे. हळदीने माखलेले वस्त्र त्याने धारण केले असून आपल्या चार भुजांमध्ये पाश, अंकुश, मोदक आणि दात धारण केला आहे.

एकाक्षरी मंत्राने ह्याची उपासना केली जाते.

उच्छिष्टगणपती - तंत्रसारातल्या वर्णनानुसार, हा गणपती रक्तवर्णी, चतुर्भुज, तीन डोळ्यांचा असून, त्याचं मस्तक जटामंडित असून, मस्तकावर चंद्र विराजमान आहे. रक्तवर्णी वस्त्रे परिधान केलेली असून, रक्तवर्णी कमळाच्या आसनावर तो बसला आहे, चेहर्‍यावर प्रसन्न हास्य आहे. उजव्या बाजूचा वरचा हात वरमुद्रा दाखवत असून, खालच्या हातात दात पकडलेला आहे. डाव्या बाजूचा वरील हातात पाश तर खालच्या हातात अंकुश आहे. नाना प्रकारचे अलंकार त्याने धारण केले आहेत.

उपासनेचा मंत्र दशा़क्षरी आहे.

तंत्रसारात म्हटल्याप्रमाणे या गणपतीचे पूजा विधान साधकाने उष्ट्या मुखाने आणि अशुचि अवस्थेत करावे. साग्रसंगीत पूजा करण्याची आवश्यकता नसून, मानसिक जप केला तरी चालते.

गर्ग मुनींच्या सांगण्यानुसार, साधकाने निर्जन अश्या ठिकाणी, वनात बसून, रक्तचंदनाने माखलेला तांबूल खाताना या गणपतीची साधना करावी, तर भृगू मुनींच्या मतानुसार आराधना करताना फळे खाता खाता जप करावा. अजून एका मतानुसार मोदक खाताना जप करावा.

उच्छिष्टगणपतीचे उपासक कपाळावर तांबडा टिळा लावतात.

सुवर्ण गणपती व संतान गणपती ह्यांच्या उपासकांची पूजा पद्धत साधारण वैदिक पूजा पद्धतीशी साम्य सांगणारी आहे.

गाणपत्यांसाठी गणपती हे परम दैवत आहे, साक्षात जीवनाचा स्वामी, यासाठी त्याचे पूजन सर्वांआधी.

आकाशस्याधिपो विष्णुरग्नेश्चैव महेश्वरी l
वायो: सूर्यः क्षितेरीशो जीवनस्य गणाधिपः ll

संदर्भः १. गणेशकोष २. कल्याण श्रीगणेश विशेषांक, गीताप्रेस, गोरखपूर.

No comments: