December 20, 2007

सुहृद - भाग ३

बागेत जाता जाता जाई हळूच सुनिताकडे पाहून पुटपुटली, "तू जाऊ नकोस हं कुठे, आमच्या बरोबरच थांब... "

सुनिताने जाईकडे बघत डोळे मोठ्ठे केले!! तिला जाम हसू यायला लागल होतं, कसबस गंभीर राहण्याचा प्रयत्न करत ती जाईला हळू आवाजात म्हणाली, "चक्रमच आहेस!! मी काय करू तिथे?? कबाबमें हड्डी! अनिकेत काय खातोय का तुला??"

"अग पण... अस काय ग... थांब ना... "

"गप ग...!! अनिकेत मारेल मला!! वेडी आहेस का तू?? मी आहे पलीकडेच..... तू बोलून घे, काय? कळल नं?"

घराच्या मागच्या बाजूला बसण्यासाठी सिमेंटचे छोटे बाक होते, तिथे मंडळी जाऊन बसली. थोड्याश्या इथल्या तिथल्या गप्पानंतर पाचेक मिनिटांत सुनिता काहीतरी कारण काढून तिथून उठली. सुनिता गेल्यावर अचानक वातावरणात थोडस अवघडलेपण भरुन आल.... दोन एक मिनिटं अशीच शांततेत गेली.... अचानक, एक क्षणी अनिकेत अन जाईची नजर एकमेकांना मिळाली, अन दोघांच्याही चेहर्‍यावर हसू उमलल...

"टेंशन आलय का??" अनिकेत जाईला विचारत होता. "खर सांगायच तर, थोडस मलाही आल होतच.... " अनिकेत हसर्‍या चेहर्‍याने सांगत होता.

जाईने त्याच्याकडे क्षण, दोन क्षण पाहिल. तीच फोटोतल्यासारखीच आर्जवी, हसरी नजर.... शांत, समजूतदार आवाज, बोलण्याची पद्धत... जाईला आत कुठेतरी अनिकेतबद्दल खूप विश्वास वाटला.
"जाई, तुला मान्य आहे ना हे लग्न? नाही, म्हणजे आई दादांना तू आवडली आहेस. दादांना तर एकदमच!! लेक घरी आणायची घाई झालीये त्यांना. ते तर पसंती सांगूनही मोकळे झालेत!! खर तर, अप्पांनी आम्हांला सुचवल तुझ स्थळ, आणि त्या सर्वांकडून तुझ्या विषयी अन तुझ्या कुटुंबाबद्दल चांगलच ऐकलय आम्ही. जे काही ऐकलय ते आवडलय. तुझा फोटोही दाखवला होता सुनिताने...." जाई जिवाचा कान करून ऐकत होती.... "आज तुला प्रत्यक्ष बघतोय. मलाही आवडली आहेस तू, पण तुझ्याही काही स्वतःच्या अपेक्षा, कल्पना असतीलच ना?? त्यात बसतोय का मी? माझे आई वडिल? काही घाई नाही जाई, तू विचार कर थोडा.... आणि ठरव, मगच कळव मला. हव तर सुनिताकडे निरोप दे... दादांनी खर तर एकदम अशी घाई नको होती करायला..."

"नाही, तस नाही.... " एकदम जाईच्या तोंडून शब्द निघून गेले!!

"म्हणजे...??" मिश्किल हसत, जाईकडे बघत अनिकेत विचारत होता. जाई त्या नजरेने मोहरली!! "नवरा मुलगा पसंत आहे तर तुला??" जाईने हसत, थोडस लाजत होकारार्थी मान हलवली. अनिकेत तिच्याकडे बघतच राहिला!! किती निर्व्याज, मुग्ध दिसते ही!! "सुटलो बुवा एकदाचा!! तू नकार दिलास तर काय करू असा प्रश्न पडला होता मला तुला पाहिल्यापासून!!"

हसर्‍या, आश्चर्यचकीत चेहर्‍याने जाईने अनिकेतकडे पाहिले अन मनाला मनाची खूण पटली. जाई आता पहिल्यापेक्षा खूप सावरली होती.

"अनिकेत, एक सांगू का पण?"

"बोल ना.... काय झाल? काही अडचण आहे का??"

"नाही, तस नाही, पण थोड बोलू का?? मी आता एकुलती एक मुलगी आहे माझ्या आई बाबांची. लग्न झाल, दुसर्‍या घरात गेले तरी मला त्यांची जबाबदारी घ्यायची आहे. तुझ्या आई वडिलांना जस मी आपल करेन, तसच माझ्या नवर्‍यानेही माझ्या आई बाबांना आपलस केलेल मला आवडेल.... संसारात मला माझ्या नवर्‍याची सुहृद बनायला आवडेल आणि माझा नवराही माझा सुहृद असावा एवढीच अपेक्षा आहे माझी...."

अनिकेत आश्वासक हसला. "याबाबतीत तुला कधी तक्रारीची वेळ नाही येणार जाई... विश्वास ठेव माझ्यावर..."

"म्हटल, आम्हीं यावं का??" सुनिता येता येता हसत हसत विचारत होती!! " मी आपल म्हटल, की जाई येईल पाचच मिनिटांत सांगतsss, चल, जाऊया म्हणून!! काय ग जाई?? बघते तर तुम्ही आपले इथे गप्पा मारताय!! काय रे बोलत होता एवढ??" उत्तर म्हणून सुनिताला जाईने एक चिमटा काढला!! "आई गsss... हं!! चला आता!! वाट पहात असतील सगळे... पण काय रे अनिकेत..." सुनिताचा दोघांना चिडवण्याचा मूड अजून संपला नव्हता!! " बाग पाहिली का तू इथली?? अन ही वेल पाहिलीस का?? कशी छान बहरलीये ना? कसली आहे माहिती आहे काsss, जाईची!! जाई बघ किती फुललीय, आवडली का??" सुनिता मिश्किलपणे अनिकेतला विचारत होती.

सुनिताची बडबड ऐकून जाईने उगाच खोट्या रागाने तिच्याकडे पाहिल, मनातल्या मनात, अनिकेत काय उत्तर देतो, याची उत्सुकता तिलाही होतीच!!

"हो। खूप आवडली." अनिकेत जाईकडे बघत हसत उत्तरला. सुखाचा वर्षाव अंगावर झेलत फुललेल्या, आनंदी चेहर्‍याने जाई तिथून मागील दारातून घरात पळाली!!

बैठकीच्या खोलीत मास्तरांचा प्रश्न ऐकून दादासाहेब प्रथमच जरा गंभीर झाले होते... "दिक्षीतसाहेब, मला एकच मुलगा. तुमचीही एकच मुलगी. मला फक्त दोन चांगली घर जोडली जाण्यामधे स्वारस्य आहे. चांगली माणस जोडायची आहेत मला. आमच्या काहीच अपेक्षा नाहीत देण्या घेण्या बाबतीत, अगदी मनापासून सांगतोय. आपण एकत्रच लग्नाची सारी व्यवस्था पाहू. अहो, आमचाही एकच मुलगा, आम्ही ही जरा भाग घेऊ हौसमौज करण्यात!! कस?? आणि पत्रिकेच म्हणाल ना, तर माझा काही विश्वास नाही यावर. पत्रिका पाहण्यापेक्षा मी माणस पाहण्याला जास्त महत्व देतो!! पटतय का पहा... आता जर मुलांनी एकमेकांना पसंत केल असेल तर..."

एवढयात सुनिता अन अनिकेत पुढच्या दाराने आत शिरले. दोघांच्या चेहर्‍यांवरचा आनंद पाहून बैठकीतही सार्‍यांच्या चेहर्‍यावर हसू उमटल. मुलांचाही होकार सार्‍यांना कळला होता.

अप्पा म्हणाले, "वैनी, तोंड गोड करा आता! गजाननापुढे वात उजळा.... "

मास्तरांच्या पत्नी स्वयंपाकघरात देवापुढे निरंजन उजळण्यासाठी अन काहीतरी गोड आणण्यासाठी गेल्या. आत जाई हसर्‍या चेहर्‍याने उभी होती. लेक खूप खुषीत, समाधानात आहे, पाहून आईच मनही सुखावल, अन लेकीला त्यांनी मायेने जवळ घेतल....

अपूर्ण.....

No comments: